धोनी-युवीच्या फटकेबाजीने इंग्लंडला हरवले

भारताने तीन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली

कटक, 19 जानेवारी 2017 :

कर्णधारपदावरून नुकताच पायउतार झालेला महेंद्र सिंग धोनी आणि तडाकेबाज युवराज सिंग यांनी केलेल्या बेफाम फटकेबाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. कटक सामान्यात भारतीय संघाने 15 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांची मालिका 2-0 ने काबीज केली आहे.

या सामन्याचे वैशिष्ठ्य़ म्हणजे युवराज सिंगने 150 धावा करीत आपली वनडे मधील सर्वोच्च धावसंख्याही नोंदवली. तर माजी कर्णधार महेंद्र सिंगनेही 134 धावांची खेळी करत भारताची स्थिती मजबूत केली होती. या दोघांच्या विक्रमी भागीदारीमुळे भारताने इंग्लडविरोधात 6 बाद 381 धावांचे आव्हान उभे केले.

भारताच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना इंग्लंडनेही दमदार सुरुवात केली होती. जेसन रॉय आणि जो रुट यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलेच तंगवले. त्यांच्यानंतर मॉर्गननेदेखील इंग्लंडच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. मात्र तो 49 व्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकात 22 धावांची गरज इंग्लंडला होती. मात्र भरवशाच्या भुवनेश्वरने अवघ्या 6 धावा देत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. भारताने हा सामना 15 धावांनी जिंकला.  या विजयामुळे भारताने कसोटीसह एक दिवसीय सामन्यांमध्येही इंग्लंडला पराभूत केले.

yuvi1

शतकासाठी खूप मेहनत घेतली –युवराजसिंग

दिर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या धडाकेबाज युवराज सिंगवर स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी होती. या संधीचा पुरेपूर फायदा उठवत युवराजने इंग्लंडच्या गोलदाजांची पिसे काढली. 150 धावांच्या विक्रमी खेळीत त्याने 21 चौकार आणि 3 षटकार खेचले. तब्बल सहा वर्षानंतर शतक झळकावल्यामुळे युवराज भावूक झाला होता. या शतकासाठी आपण खूप मेहनत घेतल्याचे त्याने सांगितले.