महावितरणचे अध्यक्ष संजीव कुमार यांचे आवाहन
पुणे,18 जानेवारी 2017/AV News Bureau:
राज्यातील विद्युत अपघातांच्या प्रकारांचे व त्यामागील नेमक्या कारणांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करावे, यासाठी विद्युत सुरक्षेच्या प्रबोधनाची प्रक्रिया निरंतर सुरु ठेवावी असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.
राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाकडून आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहाचा राज्यस्तरीय समारोप फातिमानगरमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संजीव कुमार बोलत होते. महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे तसेच विजय चौरे, अरुण अवघड पाटील, गणेश फुलारी, चंद्गकांत ब्रिद, आर. देशमुख, दिनेशकुमार ओहोळ, सुनील बोरसे यांची उपस्थिती होती.
राज्यातील विद्युत अपघातांच्या प्रकारांचे व त्यामागील नेमक्या कारणांचे विश्लेषण केले पाहिजे. कोणत्या ठिकाणी जास्त अपघात होतात. तेथील सामाजिक वर्ग कोणता आहे. कोणत्या प्रकारच्या औद्योगिक कंपन्यांमध्ये किंवा घरांमध्ये अपघात जास्त होतात हे शोधून काढले पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधन करण्याची काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या प्रकारच्या विद्युत सुरक्षा संदेशांची गरज आहे तेच नेमकेपणाने सांगितले गेले पाहिजे. याबाबत वीज कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन संजीव कुमार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य विद्युत निरीक्षक सुहास बागडे यांनी केले. विद्युत अपघातांमागे विद्युत सुरक्षेबाबतचे अज्ञान किंवा दुर्लक्ष सर्वाधिक कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्युत सुरक्षेचे प्रबोधन, जनजागरण अतिशय महत्वाचे झाले आहे. महावितरणकडून जानेवारी 2017 च्या वीजदेयकांमध्ये विद्युत सुरक्षेबाबत प्रबोधनात्मक माहिती प्रसिद्ध होणार आहे. असे बागडे यांनी सांगितले.
विद्युत निरीक्षण मंडलाचे अधीक्षक अभियंता एस. आर. नलावडे यांनी विद्युत सुरक्षा सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती दिली तर प्रमुख पाहुण्यांसह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विद्युत सुरक्षा सप्ताहात सक्रीय योगदान देणार्या कंपन्या व संघटनांच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन भूषण इनामदार यांनी केले तर विद्युत विद्युत निरीक्षक एन. आय. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महावितरणचे मुख्य अभियंता रामराव मुंडे (पुणे), नागनाथ इरवाडकर (बारामती), जितेंद्र सोनवणे (प्रभारी, कोल्हापूर), विद्युत निरीक्षण मंडलाचे अधीक्षक अभियंता डी. एस. खोंडे (नागपूर), व्ही. व्ही. नागदेव (औरंगाबाद), ‘कमिन्स’चे शैलेश हट्टी, टाटा मोटर्सचे मनोज बडवे, ‘मर्सिडिज बेन्ज’चे गणेश दळवी आदींसह विविध औद्योगिक कंपन्या, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.