आम्रमार्ग रुंदीकरणासाठी 171 झाडांवर कुऱ्हाड

तब्बल 671 झाडांचे स्थलांतरही होणार

स्वप्ना हरळकर/ AV News

नवी मुंबई, 17 जानेवारी 2017 :

किल्ले गावठाण ते जेएनपीटी मार्गावरील आम्रमार्गाच्या रस्ता रुंदीकरणासाठी तब्बल 171 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येणार आहे. त्याशिवाय 671 झाडे स्थलांतरीत करण्याचे कामही लवकरच सुरू होणार आहे. याबाबत नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महिन्याभरापूर्वी नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या होत्या. मात्र एकही सूचना वा हरकत पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जेएनपीटी मार्गावर किल्ले गावठाण भागात आम्रमार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी यांच्या सहकार्यातून हे काम करण्यात येणार आहे. आम्रमार्गाच्या दोन्ही बाजूला पूर्ण वाढलेली झाडे आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या या कामात 842 झाडे अडथळा ठरत असल्याचे रस्ता विस्तारीकरणाचे काम करणाऱ्या कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे या कंपनीने एकूण 842 झाडांबाबत निर्णय घेण्यासाठी नवी मुंबई महापालिकेशी पत्रव्यवहार केला होता.

त्यानुसार रस्ता विस्तारीकरणाचे काम  करणाऱ्या कंपनीच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने महिन्याभरापूर्वी 171 झाडे तोडणे आणि 671 झाडांच्या स्थलांतराबाबत जाहीर नोटीस काढली होती. त्या नोटीसा आम्रमार्गालगतच्या झाडांवर चिकटवण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र याबाबत एकही हरकत वा सूचना आली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीने पुढील कार्यवाही सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

झाडे तोडणे व स्थलांतरीत करण्यासाठी  लावलेली नोटिस

nmmc notice for tree cutting