मुंबई,ता.16 जानेवारी/AV News Bureau :
गर्भात व्यंग असल्याने 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मागणा-या एका बावीस वर्षीय विवाहितेला सर्वोच्च न्यायालयाने आज गर्भपात करण्यासाठी परवानगी दिली. के.ई.एम.रूग्णालयातील सात डॉक्टरांचा गट याबाबत अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आला होता. या गटाने अहवाल दिल्यानंतरच न्यायाधीश एस.एस. बोबडे आणि एल. एन. राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
हा गर्भपात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच व्हावा आणि यामध्ये वापरण्यात आलेल्या पध्दतीचा संपूर्ण अहवाल देण्यात यावा. असेही न्यायालयाने म्हटले आहे. मुंबईतील एका विवाहित महिलेच्या सोनोग्राफी चाचणीमध्ये गर्भाला डोक्याची कवटी नसल्याचे आढळून आले. मात्र तोपर्यंत गर्भ 24 आठवड्याचा झाला होता. कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंतच गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्यास डॉक्टरांनी परवानागी नाकारली. त्यामुळे अखेर या महिलेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या महिलेवर सध्या के.ई.एम.रूग्णालयात उपचार सुरू आहेत.