गांधींऐवजी मोदींच्या छायाचित्राचा मुद्दा चिघळला

पंतप्रधानांनी माफी मागावी-सचिन अहिर यांची मागणी

मुंबई, 14 जानेवारी 2017/AV News Bureau :

खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर  महात्मा गांधींच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. याबाबत विरोधकांनी खरपूस टीका केली असून याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. या घटनेचा  निषेध  करण्यासाठी उद्या मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याची घोषणाही अहिर केली.

खादी ग्रामोद्योग विकास महामंडळाच्या दिनदर्शिका आणि रोजनिशीवर महात्मा गांधींच्या छायाचित्राऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी झळकल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  दिनदर्शिकेवरून गांधीजींचे छायाचित्र हटवण्याचे नेमके कारण स्पष्ट होणे गरजेचे आहे. खादी आणि ग्रामोद्योगासाठी आता गांधीजींची छबी सरकारला योग्य वाटत नाही का, असा सवाल करत गांधीजींच्या छायाचित्रासह या दिनदर्शिका आणि रोजनिशीचे पुनर्मुद्रण करण्याची मागणी अहिर यांनी केली.

महिला तसेच युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या गांधीजींच्या पुतळ्याजवळ या मुद्यावरून शुक्रवारी आंदोलन करण्यात आले होते.