मुंबई मॅराथॉनच्या आयोजकांना महापालिकेची नोटिस
रक्कम न भरल्यास विद्रुपकरणांतर्गत खटला दाखल करणार
मुंबई, 13 जानेवारी 2017/ AV News Bureau :
येत्या रविवारी होणाऱ्या ‘स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅराथॉन स्पर्धा होणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात जाहिरात फलक लावण्यासह लेजर शो देखील आयोजित केला जाणार आहे. मात्र या जाहिराती आणि लेजर शोसाठी जाहिरात शुल्क, भू – वापर शुल्क आणि सुरक्षा ठेव याकरिता आयोजकांनी 24 तासांत महपालिकेकडे ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ एवढी रक्कम जमा करावी, अशी नोटीस महापालिकेच्या ए विभागातर्फे आयोजकांना पाठविण्यात आली आहे.
ही रक्कम भरण्याबाबतचे पत्र महापालिकेच्या अनुज्ञापन अधिक्षक यांच्याद्वारे यापूर्वीच देण्यात आले होते. मात्र मॅरेथॉन स्पर्धा आयोजकांनी ही रक्कम अद्याप भरलेली नाही. त्यामुळे पुढील २४ तासात ही रक्कम महापालिकेकडे भरण्याची नोटिस मॅराथॉन चे आयोजक / संयोजक ‘मे. प्रोकॅम इंटरनॅशनल लि.’ यांना महापालिकेच्या ‘ए’विभागाद्वारे देण्यात आली आहे.
ही रक्कम न भरल्यास आयोजकांवर विद्रुपीकरणाबाबत तसेच अनधिकृतपणे जाहिरात फलक व तत्सम बाबी करण्याबाबत संबंधित अधिनियमातील (Maharashtra Defacement of Properties Act / MMC Act) तरतूदींनुसार खटला दाखल केला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.