जाहिरनाम्यासाठी सूचना पाठवा

भाजपचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई ,13 जानेवारी 2017/ AV News Bureau:

मुंबई महापालिकेचा कारभार ‘पारदर्शी’ असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने घेतली आहे. त्यामुळे भाजपचा जाहीरनामाही पारदर्शी असावा यासाठी मुंबईकरांनीदेखील आपल्या सूचना सोशल मिडियाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन मुंबई भाजपने केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरू आहे. यापार्श्वभूमीवर जाहीरनामा समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीत मुंबईकरांकडून सूचना मागविण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या जाहीरनामा समितीची बैठक दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात पार पडली. या समितीमध्ये आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी,  महापालिका गटनेते मनोज कोटक, भाजपा उपाध्यक्ष भालचंद्र शिरसाट, सरचिटणीस सुमंत घैसास माजी आमदार अतुल शाह, माजी नगरसेवक सुनिल गणाचार्य आणि समीर देसाई यांचा समावेश आहे.

या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईकरांच्या अपेक्षा ही जाणून घेण्याचे भाजपाने निश्चित केले आहे.  त्यासाठी ईमेल आणि ट्वीटरवर स्वतंत्र अकाऊंट तयार केले आहे. या माध्यमातून येणाऱ्या जनतेच्या सूचना, अपेक्षा लक्षात घेऊन जाहीरनाम्याचा मसुदा अंतिम करण्यात येईल अशी माहीती या समितीचे सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिली. ईमेल – pardarshimumbai@gmail.com ,ट्विटर अकाऊंट @pardarshimumbai, फेसबूक  Pardarshi Mumbai  यावर आपल्या सूचना पाठवाव्यात, अस आवाहन भाजपने केले आहे.