मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, 12 जानेवारी 2017AV News Bureau :
भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने विविध समाजांना एकमेकांच्या विरोधात झुंजवण्याच्या ऐवजी समाजाच्या सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सरकारच्या कामातील सकारात्मकता दिसल्याने संपूर्ण समाजाने नगरपालिका निवडणुकीतील यशाच्या रुपाने कामाची पावती दिली. आगामी महापालिका, जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत परिवर्तनाच्या आत्मविश्वासाने जनतेसमोर जा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला. भाजपा प्रदेश कार्यसमितीच्या ठाणे येथील बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा व भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केली. नोटबंदीचा निर्णय हा त्याचाच भाग होता. त्यांच्या निर्णयाला जनतेने पूर्ण पाठिंबा दिला. पंतप्रधान मोदी हे देशासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण देणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा काही हेतू नाही. त्यांच्या मार्गाने आपल्याला चालायचे आहे. त्यांचे मावळे म्हणून निवडणुकीला सामोरे जायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सब का साथ सब का विकास हेच भाजपाचे धोरण असून केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेला देऊन आपल्याला आगामी निवडणुकीत विजय मिळवायचा आहे, असे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
भाजपाच्या नगरपालिका निवडणुकीतील यशामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून आगामी जिल्हा परिषद – महापालिका निवडणुकीत भाजपावर जातीयवादाचा आरोप करतील. नगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या माध्यमातून अल्पसंख्य समाजाचे तीन नगराध्यक्ष निवडून आले व ४५ नगरसेवक निवडून आले. अनुसूचित जातीचे सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे सब का साथ सब का विकास हेच भाजपाचे धोरण आहे व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात जातीयवादाचा आरोप खोडून काढावा, असे आवाहनही दानवे यांनी केले.
कार्यसमिती बैठकीस व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर व डॉ. सुभाष भामरे, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सरोज पांडे, सहप्रभारी खा. राकेश सिंहजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, सहसंघटन मंत्री व्ही. सतीशजी,राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, माजी मंत्री एकनाथ खडसे, प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर, आ. अतुल भातखळकर, आ. डॉ. संजय कुटे, डॉ. रामदास आंबटकर, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, ठाणे विभाग अध्यक्ष खा. कपिल पाटील, मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, आ. संजय केळकर, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले व ठाणे ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे उपस्थित होते.