डॉ. कोटणीस यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर पाठवलेला शोकसंदेश
मुंबई, 10 जानेवारी 2010/ AV News Bureau :
चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष माओ झेडाँग यांनी आपल्या सुलेखन शैलीत डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना शोकसंदेश पाठवला होता. यंदा कोटणीस यांच्या निधनाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने माओ यांच्या या शोकसंदेशाचे जतन डॉ. कोटणीस यांच्या सोलापूर जिल्ह्यातील जन्मगावी केले जाणार आहे. या दस्तावेजाचे लोकार्पण चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई यांच्या हस्ते आज करण्यात आले.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबई, मुंबई विद्यापीठ आणि चीन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने कालिना येथील झी शियानलिन सेंटर फॉर इंडिया चायना स्टडीज् येथे हा कार्यक्रम पार पडला.
चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीचे जनक आणि माजी अध्यक्ष माओ झेडाँग हे उत्तम सुलेखनकार होते, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यांच्या चीनबाहेर असलेल्या केवळ तीन सुलेखन शैलीतील पत्रांपैकी एक पत्र म्हणजे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेला शोकसंदेश आहे.
या कार्यक्रमाला चीनचे भारतातील राजदूत लाऊ झाओहुई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, सोलापूरच्या महापौर सुशिला आवुटे, महाराष्ट्राचे राजशिष्टाचार प्रमुख सुमित मलिक, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, चीनचे मुंबईतील कॉन्सुल जनरल झेन झियुआन, डॉ. कोटणीस यांचे कुटुंबीय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.