नवी मुंबई, 9 जानेवारी 17 / AV News Bureau:
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी सिडको महामंडळातर्फे 5 फेब्रुवारी 2014 रोजी जाहीर करण्यात आलेल्या जागतिक निविदा प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा सादर करण्यास 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीतील बहुतेक सर्व अडथळे दूर झालेले आहेत. त्यामुळे विमानतळ उभारणीच्या कामाला वेग आला आहे. या विमानतळाच्या जागतिक निविदा प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आर्थिक निविदा सादर करण्यासाठी 9 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक निविदा सादर करण्याकरिता आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 25 जानेवारी 2017 असेल.
9 फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीमध्ये एमआयएएल (जीव्हीके) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाकरिता पूर्व पात्रता फेरीमध्ये जीएमआर, एमआयएएल (जीव्हीके), टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झुरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत.