बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ, अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचे 61 गुन्हे
2015 च्या तुलनेत गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचा पोलिसांचा दावा
नवी मुंबई, 7 जानेवारी 17/AV News Bureau:
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सन 2016 या वर्षात तब्बल 4081 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 604 गुन्हे कमी झाले असल्याचे सांगण्यात येत असले तरी बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. वर्षभरात बलात्काराचे 139 गुन्हे दाखल झाले असून लहान मुलांवरील बलात्कारचे 61 गुन्हे नोंदले गेले आहेत. खून, दरोडे, चोरी, फसवणूक आदी गुन्ह्यांमध्ये काहीशी घट झाल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सह पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय, गुन्हे शाखेचे उपायुक्त दिलीप सावंत, वाहतूक शाखेचे उपायुक्त नितीन पवार आदि उपस्थित होते.
सन 2016 मध्ये नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारच्या 4801 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये खून, दरोडे, बलात्कार, घरफोडी, फसवणूक, रस्ते अपघात, वाहनचोरी, खंडणी अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे. या एकूण गुन्ह्यांपैकी 3382 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 2015 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5405 गुन्हे नोंदले गेले होते. त्यातील 3624 गुन्हे उघडकीस आले होते.
•बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. 2016 मध्ये नवी मुंबईत 139 बलात्काराचे गुन्हे नोंदविले गेले. यामध्ये अल्पवयीन मुलांवरील बलात्काराचे 61 गुन्हे नोंदले गेले आहेत. 139 गुन्ह्यांमध्ये 111 जण ओळखीचे, 12 नातेवाईक आणि 16 अनोळखी व्यक्तींकडून बलात्कार झाल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकूण 134 बलात्काराच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. गेल्यावर्षी बलात्काराचे 104 गुन्हे होते. त्यातील 102 गुन्ह्यांची उकल झाली आहे. एकूणच 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये 35 गुन्हे अधिक नोंदल्याचे दिसून आले आहे.
मागील वर्षभरात वाहन चोरींच्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यामुळे यंदा वाहन चोरीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. सराईत गुन्हेगारांवर अंंकुश ठेवण्यासाठी तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे त्याशिवाय मालमत्तासंबंधी जे गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत त्यांमध्ये आरोपींना जामीन मिळू नये यावर भर दिला जाणार आहे.पोलिस कर्मचा-यांच्या महिलांसाठी लघुउद्याोगांचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती नगराळे यांनी दिली.
सन 2016 मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे –