स्वप्ना हरळकर/ AV News
नवी मुंबई, 7 जानेवारी 17 : गेल्या काही वर्षांत समुद्र मार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस दल आपली सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून दोन अत्याधुनिक ट्रॉलर येत्या काही दिवसांत नवी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. कोणत्याही हवामानात तग धरणारे आणि आधुनिक दळणवळण यंत्रणांनी सज्ज असणाऱ्या या ट्रॉलरमुळे समुद्रातील गस्तीक्षमता कैकपटीने वाढणार आहे.
मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्यानंतर सागरी सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या सागरी सीमांचं रक्षण करताना सुरक्षा दलाला काही नैसर्गिक संकटांचाही सामना करावा लागतो. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील समुद्रात सध्या सात गस्ती नौकांद्वारे गस्त घातली जाते. मात्र अनेकदा प्रतिकूल हवामानात या गस्तीवरही निर्बंध येतात. तसेच छोट्या गस्ती नौकांमधून अधिक सामान वा व्यक्ती नेता येत नाही. यासाठी नवी मुंबई पोलिसांनी दोन मोठे ट्रॉलर भाड्याने घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विशेष शाखेचे उपायुक्त नितीन पवार यांनी दिली.
या नव्या ट्रॉलरमुळे अधिक मनुष्यबळ तसेच शस्रे जवळ बाळगून आणि दिर्घकाळ समुद्रात ठाण मांडून लांबपर्यंत गस्त घालता येणे शक्य होणार आहे. शिवाय या ट्रॉलरवर आधुनिक दळणवळण यंत्रणाही उपलब्ध असल्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत तातडीने कारवाई करणे आणि नियंत्रण कक्षाशी त्वरीत संपर्क साधून मदत मागविणे शक्य होईल, असेही पवार यांनी सांगितले.
सागरी सुरक्षा दलाचे मनुष्यबळ
सध्या सागरी सुरक्षा दलात 85 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 14 अधिकारी आहेत. 7 पोलीस निरीक्षक, 12 तांत्रिक कर्मचारी, 20 मोटार खलाशी अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे.
37 संवेदनशील ठिकाणांची नोंद
सागरी सुरक्षेच्या दृष्टिने मोरा, उरण, न्हावा शेवा, वाशी या पाच पोलिस ठाण्यांना सागरी पोलिस ठाण्यांचा दर्जा देण्यात आला आहे.
नवी मुंबई शहराला 80 किलोमीटरचा सागरी किनारा आणि 60 किलोमीटर लांबीचा खाडीचा भाग असा सुमारे 110 किलोमीटरचा किनारा आहे. या किनारी भागात घारापुरी, जेएनपीटी,ओएनजीसी यांसारख्या संवेदनशील ठिकाणांचाही समावेश आहे. घुसखोरी होऊ शकेल अशी 37 संवेदनशील ठिकाणे नवी मुंबईच्या सागरी भागात नोंदविण्यात आली आहेत. शिवाय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत उरण ते रबाळे पर्यंतचा परिसर आहे. दिघा ते उरणदरम्यान असणाऱ्या खाडी किनाऱ्यावर नवी मुंबई पोलिसांना सतत लक्ष ठेवावे लागते.
घारापुरी येथे ऑपरेशन रूम
घारपुरी हे बेट नवी मुंबई पोलिसांच्या अखत्यारित येते. या बेटाची आणि पर्यायाने तिथे येणा-या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारीही नवी मुंबई पोलिसांवर आहे. या भागात होत असलेली मासेमारी, तिथे असलेला नागरिकांचा वावर या सर्वांचा विचार करून घारपुरी बेटावर दोन ऑपरेशन रूम सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणाहून संपूर्ण घारापूरी परिसरावर बारकाईने लक्ष ठेवणे आणि संशयास्पद गोष्टींची तातडीने शहानिशा करणे शक्य झाल्याचे पवार यांनी सांगितले.