वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांना लाभ मिळणार
मुंबई, 4 जानेवारी 2016 / AV News Bureau :
राज्यातील अकरावी, बारावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट अनुदान उपलब्ध करून देण्याच्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’ला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
• विद्यार्थ्याला 43 ते 60 हजार वार्षिक रक्कम मिळणार
या योजनेची अंमलबजावणी 2016 -17 या आर्थिक वर्षापासून केली जाणार आहे. तिचा लाभ जिल्हानिहाय गुणवत्ता यादीनुसार सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी शासन दरवर्षी 121 कोटी इतका खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना दिली जाणारी 43 हजार ते 60 हजार इतकी वार्षिक रक्कम आधार क्रमांकाशी संलग्न बँक खात्यांमध्ये डीबीडी पोर्टलमार्फत थेट वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची 44 पदे नियुक्त करण्यात येणार आहेत.
• वसतिगृहांच्या तुलनेत विद्यार्थी जास्त
मागासवर्गीय मुला-मुलींसाठी राज्यात 441 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहे. त्यापैकी 234 मुलांची आणि 207 मुलींची वसतिगृहे आहेत. मुलांच्या वसतिगृहाची प्रवेशक्षमता 21 हजार 660 आणि मुलींच्या वसतिगृहाची प्रवेश क्षमता 19 हजार 860 अशी एकूण 41 हजार 520 एवढी या वसतिगृहांची प्रवेश क्षमता आहे. राज्यात व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढती आहे. तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील वसतिगृहांच्या प्रवेशासाठी 2015-16 मध्ये 45 हजार 849 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 11 वी व 12 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या 18 हजार 578 विद्यार्थ्यांच्या अर्जापैकी 6 हजार 694 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. तसेच 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमांस 7 हजार 907 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. यावर्षी (2016-17) मध्ये 44 हजार 302 अर्ज प्राप्त झालेले असून त्यापैकी 17 हजार विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे शक्य होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागू नये यासाठी आजचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
• विदयार्थ्यांसमोर दोन पर्याय
सन 2017-18 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असतील. सन 2016-17 या वर्षात सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांना तर पुढील वर्षी (2017-18) 10 हजाराची संभाव्य वाढ गृहित धरून सुमारे 25 हजार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
• 60 टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला समाजकल्याण विभागाच्या संबंधित सहाय्यक आयुक्ताकडे ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास 10 मध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच 12 वी मध्ये किमान 60 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच पुढील पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी या योजनेचा लाभ मिळेल. हा लाभ अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठीच आणि एकूण शैक्षणिक कालावधीत कमाल 7 वर्षासाठी मिळेल. या योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असून त्यांना किमान टक्केवारीची मर्यादा 50 टक्के इतकी असेल. त्यांच्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.