काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारने नोटबंदीचे चांगले पाऊल उचलले. मात्र योग्य उपाययोजनांअभावी संभ्रमावस्था असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. यावर लवकरच कायमस्वरुपी तोडगा काढावा,असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
- पंतप्रधानांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय खूपच चांगला आहे. पण हा निर्णय घेण्याआधी योग्य नियोजनाची गरज होती. म्हणजे लोकांना त्रास झाला नसता. मोठ्या रांगा लावायचा प्रश्नच उद्भवला नसता. असे असले तरी ही योजना नक्कीच चांगली आहे. – बा.कृ. क्षीरसागर, नवी मुंबई
- पंतप्रधानांनी राबवलेली योजना स्तुत्य आहे. परंतु नियोजन बरोबर नाही. नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांचा जीवदेखील गेला. सरकारने प्रत्येक वेळी नियम बदलले .त्याचाही परिणाम लोकांवर झाला. आता बेहिशेबी मालमत्ता असणाऱ्यांकडे सरकारने मोर्चा वळविला असल्याचे सांगत आहे. त्यांचे काय होईल ते सांगता येत नाही. – रामोजी उबाळे, नवी मुंबई
- काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांनी घेतला निर्णय चांगला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन. मात्र 2000, 3000 असे पैसे न देता नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार, गरजेनुसार पैसे मिळायला पाहिजेत. म्हणजेच लोकांची अडचण होता कामा नये, याकडे सरकारने अधिक लक्ष देण्याची गरज आहे. – रघुनाथ रामचंद्र बने, नवी मुंबई
- नोटाबंदीचा जो निर्णय सरकारने घेतला आहे, तो योग्यच आहे. मात्र 2000 रुपयांची जी नोट काढली आहे, ते चुकीचे आहे. कारण सर्वसामान्य लोकांना 2000 चे सुट्टे पैसे मिळत नाहीत. पैशांची गुंतवणूक रियल इस्टेट, सोने, हिरे आदींमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. मग असा बेनामी संपत्तीमध्ये लपवलेला पैसा कसा निघणार ? हा प्रश्न आहे. तसेच नोटाबंदीचा निर्णय घेण्यापूर्वी 500, 100 च्या भरपूर नोटा छापायला हव्या होत्या. मात्र तसे न केल्यामुळे गडबड झाली. सारे सुरळीत कधी होणार याकडे लोकांचे लक्ष आहे. -अरविंद जयकर, नवी मुंबई
- नोटबंदीबाबत खूप चर्चा झाली. लोकांना भरपूर माहिती मिळाली. नोटाबंदीचा नागरिकांना मोठा त्रासही सहन करावा लागला. आता पुढे काय होईल, हे देवालाच ठाऊक. – पेरीस्वामी अम्मासी, नवी मुंबई