नवी मुंबई,24 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
स्वच्छ भारत मिशन तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर (अग्रदूत) म्हणून प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन यांनी निवड करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येत असलेल्या सुविधांच्या मालमत्तेचे नागरिकांकडून नुकसान होऊ नये, झोपडपट्टी भागातील रहिवाश्यांनी उघड्यावर शौचास न जाणे, सामुदायिक शौचालयाचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लॅस्टीक पिशव्यांचा वापर न करणे, रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे,उद्यानातील मालमत्तेचे नुकसान न करणे आदी मुद्यांवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबईचे रहिवासी असणाऱ्या शंकर महादेवन यांना नवी मुंबई स्वच्छता अभियानाचे अग्रदूत होण्याची विनंती महापालिका प्रशासानाने केली होती. त्यांनीही या उपक्रमाचा भाग होण्याबाबत आनंद व्यक्त केला.
आता नवी मुंबईचे ब्रँड अँबॅसेडर असलेल्या शंकर महादेवन यांनी नागरिकांना अवाहन करण्याकरीता जिंगल्स, रेडिओ स्पॉटस्, व्हिडीओ तयार करणे, महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वच्छता मोहिमा व कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.