AV News Bureau
पोलीस-जनता संबंध हा फार काळ चालत आलेला वादग्रस्त विषय आहे. या विषयाचे महत्व सर्वांना पटले आहे. मात्र अजूनतरी समाजात हे संबंध चांगले असल्याचे निदर्शनास येत नाही. तसे पाहिले तर कायदा आणि समाज यांचे अतूट संबंध आहेत. रोजच्या जीवनात वावरताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षणे कायद्याला तोंड द्यावे लागत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कायद्याशी संबंध येत असतो. एखाद्या व्यक्तीच्या हातून चुकून अथवा जाणून बुजून गुन्हा घडला तर मला कायदा माहीत नव्हता, ही सबब भारतातील कुठलेही न्यायालय ऐकून घेऊ शकत नाही. कारण समाजाला कायद्याची गरज असते आणि समाजातच कायद्याचे पालन होते. त्यामुळे कायदा आणि समाज हे शरीर आणि त्यावरील त्वचा इतके अतूट नाते आहे. प्रत्येक सामान्य नागरिकास कायद्याची भीती वाटते. कारण कायद्याच्या हातात दंडुका असतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि खासकरून कायदा मानणाऱ्या नागरिकांसाठी कायद्याने खूप काही करायला हवे.
कायद्याच्या दृष्टीने समाजात दोन प्रकारची माणसे असतात. एख म्हणजे कायद्याचे पालन करणारे आणि दुसरे म्हणजे कायदा मोडणारे. यापैकी कायदा पाळणारे सुमारे ८५ टक्के असतात तर कायदा मोडणाऱ्यांची संख्या १५ टक्क्यांपर्यं असते. मात्र इथे बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, जास्तीत जास्त कायदा हे कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी असतात. कायद्याचे पालन करणाऱ्यांसाठी त्यामानाने कमी कायद्यंची तरतूद आहे.
कोर्टाचा भरमसाठ खर्च, तुरुंग, पोलीस दल ही सारी व्यवस्था चिमूटभर समाज कंटकांसाठी सतत जागरूक राहून काम करीत असते. तथापि कायदा पालन करणाऱ्यांच्या कायद्याकडून खूप अपेक्षा असतात. आता सर्वसामान्यांची पोलिसांकडून काय अपेक्षा असते तर आपल्या जीवनाचे, मालमत्तेचे आणि आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे. त्यामुळे नागरिकाला आपल्या स्वातंत्र्याची जपणूक व्हावी, असे वाटते, तेव्हा तो कायदा आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या घटकाकडे म्हणजे शासनाकडे मोठया अपेक्षेने पाहत असतो. मात्र अनेकदा पोलीस जनतेचा विश्वास संपादन करण्यास असमर्थ ठरतो आणि त्याचे पर्यवसान शेवटी संबंधात बाधा येते.
पोलीस –जनता संबंध बिघडण्याचे कारण कोणते, याचा विचार केला तर आपल्याला असे आढळून येईल, की, समाजात पोलिसाकडे रक्षक म्हणून पाहिले जाते. परंतु बऱ्याचदा त्यांच्या कडक वागण्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबाबत काहीशी नकारात्मक भावना निर्माण होवू लागते. मात्र यामागेदेखील काही कारणे आहेत.जसे कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिसांना अधिक तास काम करावे लागते. त्यांच्या कामाचे स्वरुपच असे असते की,त्यांचा अधिकाधिक काळ हा गुन्हेगारांमध्येच म्हणजे नियम मोडणाऱ्यांवर वचक बसण्यातच जातो. परिणामस्वरुप ते सतत तणावाखाली वागत असतात. त्यामुळे एखाद्या गोष्टीची वा गुन्ह्याची तक्रार करायला सर्वसाधारण नागरिक गेला तर त्याच्याशी ते फटकून वागतात. त्यांच्याशी अनेकदा कठोर भाषेत बोलायलाही ते कमी करत नाहीत. त्यांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत. कर्तव्यात टाळाटाळ करतात किंवा उशीर करतात. पोलिसांच्या या वागणुकीमुळे नागरिक नाराज होतात आणि त्यांचे संबंध दुरावतात. आपल्या देशातील कायदेपद्धती आणि खासकरून गुन्हे सिद्ध करण्याची पद्धती अतिशय क्लिष्ट आहे.त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींसाठी अनेक पळवाटा काढता येतात. त्याचा परिणाम म्हणजे पोलीस दलात माजलेला भ्रष्टाचाराचा भस्मासूर.
आज पोलीस दलाला भ्रष्टाचाराने पोखरलेले आहे, असे म्हणतात. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. हप्ते घेणे, फेरीवाल्यांकडून पैसे उकळणे, मोफत खाणे, कामाबद्दल बेफिकीरी यामुळे पोलिसांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अढी निर्माण होते. सर्वसाधारणपणे पोलिसाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन सकारात्मक नसतो, असे आढळून येते. पोलिसांबद्दल मनात भीती असते. एक प्रकारची तिरस्काराची भावना जास्त असते. म्हणजेच पोलीस त्यांना जवळचा वाटत नाही. त्यामुळे एखादा बाका प्रसंग ओढवल्यास नागरिक सहसा पोलिसांकडे मदतीसाठी जात नाहीत. तर समाजातील प्रभाववाशील व्यक्तींकडे मदतीसाठी जाणे पसंत करतात. मग पोलिसांऐवजी आपल्याकडे मदतीसाठी आलेल्या व्यक्तीला आपले वजन वाढविण्यासाठी प्रभावी घटक त्यांना मदत करतात. त्यातूनच मग पोलिसांबद्दलची भावना थोडी नाराजीची होते.
पोलिसांबाबत नागरिकांचे मत प्रतिकूल होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पोलीस कामात नको तितका राजकीय हस्तक्षेप.एखाद्या गंभीर गुन्ह्यात एखादी बडी व्यक्ती गुंतलेली असली की वरून फोन आलाच म्हणून समजा, हे सत्य साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे पोलीस हा राजकारण्यांच्या हातातील बाहुले असा समज रुढ झाला आहे. म्हणजे पोलीस हा घटक नेमका कुणासाठी आणि कशासाठी ? असा संभ्रम नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. दुसरे म्हणजे पोलिसांबद्दल चित्रपटांमधूनही होणाऱ्या विपरित चित्रणाचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या मनावर होतो.
पोलिसांनी पुढाकार घेणे गरजेचे
पोलीस आणि जनता यांच्तील गैरसमज दूर होण्यासाठी प्रथम पोलिसांनीच पुढाकार घेतला पाहीजे आणि जनतेच्या मनात निर्माण झालेली अढी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहीजे. जनतेला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, याचा बारकाईने विचार करावा. आपल्याकडे येणारी व्यक्ती ही मतीसाठी आलेली असते. तिच्याशी सभ्यपणे आणि आपुलकीने वागाने. त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांना धीर द्यावा तसेच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. स्वतःचा आब राखण्यासाठी लाचार होऊन हप्तेखोरी, फेरीवाल्यांकडून मोफत खाणे तसेच राजकीय हस्तक्षेप आणि भ्रष्टाचाराला दाराबाहेर ठेवायचा नेटाने प्रयत्न करावा.
पोलीस आणि जनता संबंधांबाबतीत जनतेची भूमिकाही तेवढीच महत्वपूर्ण असते. नागरिकांदेखील लक्षात घ्यावे की, पोलीस हादेखील आपल्यासारखा माणूस आहे. त्याच्याही मर्यादा आहेत. त्यामुळे त्याची मनस्थिती समजावून घ्यावी. जर दोन्ही घटकांनी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर पोलीस- जनता संबंधांमध्ये जी अढी निर्माण झालेली आहे, ती दूर होण्यास हळूहळू सुरूवात होईल, यात शंका नाही.