महाराष्ट्र सरकारनेही उत्तराखंड सरकारचे अनुकरण करावे – अबु आझमी
मुंबई, 23 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
उत्तराखंड सरकारच्या निर्णयाप्रमाणेच महाराष्ट्रातही मुस्लिम समाजातील व्यक्तींना नमाज अदा करण्यासाठी दर शुक्रवारी किमान ९० मिनिटांचा अधिकृत कालावधी द्यावा, अशी मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबु असीम आझमी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे नमाजसाठी ९० मिनिटांचा कालावधी दिल्याबद्दल उत्तराखंड सरकारचे त्यांनी अभिनंदन केले.
उत्तराखंड राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमधील मुस्लीम धर्मियांना दर शुक्रवारी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान ९० मिनिटांचा वेळ नमाज अदा करण्यासाठी अधिकृतपणे देण्याचा निर्णय उत्तराखंडच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे मुस्लिम धर्मिय कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयीन वेळेत धार्मिक श्रद्धांचे पालन करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय आता महाराष्ट्र सरकारनेदेखील घ्यावा आणि मुस्लीम धर्मिय सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आझमी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.