नवी मुंबई, 23 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी नवी मुंबईत मेहनतीने जनतेच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून विविध कार्यक्रम घ्यावेत, ज्याचा जनतेला थेट लाभ होईल. जेणेकरून नवी मुंबईत काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल असा सल्ला उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला तसेच पुढील काळात जिल्हा काँग्रेसच्या मासिक बैठका या विभाग स्तरावर आयोजित केल्या जातील. त्यानुसार विभाग अध्यक्षांनी व पदाधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागामध्ये पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी काम करावे, असे आदेश जिल्हा कॉंग्रेस प्रभारी माणिकराव जगताप यांनी दिले.
नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची डिसेंबर महिन्याची मासिक सभा वाशी येथील काँग्रेस भवन या मुख्यालयात पार पडली. यावेळी शहरातील पक्ष कार्याचा आढावा घेण्यात आला आणि नवीन वर्षात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा ठरविण्यात आली.
केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारद्वारे जनतेला स्वप्नांचे डोस देऊन भुलवले जात आहे. ज्यामध्ये सर्व सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. महागाई, पेट्रोल, डिझेल दरवाढ, विविध करवाढ, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर सरकार कोणतेही स्पष्टिकरण न देता प्रश्न चिघळवत आहेत. याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांनी व्यक्त केले.
सभेच्या सुरुवातीला देशासाठी लढताना शहीद झालेल्या जवानांना, नोटबंदीमुळे देशभऱात मृत्युमुखी पडलेल्या नयागरिकाना तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललीता यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महाराष्ट्र प्रदेष काँग्रेस कमिटीचे प्रांत अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यात विविध टप्यात पार पडलेल्या नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणूकांत, काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आणल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.