शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना
मुंबई,23 डिसेंबर 2016/AV News Bureau :
शेतीसाठी कृषीपंपाचा वापर करणाऱ्यांच्या वीजदरात 9 ते 15 टक्के एवढी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाने जाहीर केले आहे. कृषीपंपाच्या वापरासाठी 40 ते 90 टक्के दरवाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यामुळे मंडळाने हा खुलासा केला आहे. मात्र आधीच शेतकरी त्रस्त असताना कृषीपंपाच्या वीज दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने 1 नोव्हेंबर 2016 रोजी दिलेल्या आदेशानुसार कृषीपंप ग्राहकांसाठी दरवाढ साधारणत: 4 ते 5 टक्के या प्रमाणात राहील, असे स्पष्ट केले आहे. परंतू, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी ही वीज दरवाढ 40 ते 90 टक्क्यांपर्यंत राहील असा आरोप केला आहे. आयोगाने प्रत्यक्षात मीटर असलेल्या सर्व लघुदाब कृषीपंपासाठी वीजदर रु. 2.58 प्रतीयुनिट वरुन रु. 2.94प्रतीयुनिट असे लागू केले आहे. ही वाढ 13.95 टक्के एवढी आहे. तसेच विनामीटर कृषीपंपासाठी साधारणत: 9 ते 15 टक्के एवढी दरवाढ आयोगाने मंजूर केली आहे. याशिवाय उपसा जलसिंचन योजनेसाठी 33 किव्हो आणि 66 किव्होचे वीजदर प्रत्यक्षात अनुक्रमे 2 ते 5 टक्के कमी झालेले आहेत तर 22/11 किव्होसाठी दरवाढ साधारणत: 19.5 टक्के एवढी आहे,असे राज्य विद्युत वितरण मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे विद्युत अधिनियम- 2003, कलम 65 नुसार कृषीपंपधारक शेतकऱ्यांसाठी वीजदरात अनुदान देण्यात येते. अशा अनुदान दरात वहन आकाराचाही समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वीजदरात अनुदान देण्यात येते आहे. त्यानुसार सुधारित वीजदर लागू झाल्यानंतर शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबतचा निर्देश अपेक्षित आहे.