नवी मुंबई,22 डिसेंबर 2016 /AV News Bureau :
खारघर नोडमध्ये मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. राजकीय पक्षांतर्फे शाळा तसेच खेळाच्या मैदानांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडांवर राजकीय पक्षांतर्फे बेकायदेशीररित्या बांधकाम करण्यात आले होते, असे सिडको प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सिडकोने अनधिकृत बांधकामांवर केलेली कारवाई
- सेक्टर 15 मधील घरकुल योजनेतील 25 चौ.मी. क्षेत्रफळाच्या उद्यान भूखंडावर सुनील सावर्डेकर यांच्यामार्फत कार्यक्रमाचे स्टेज बनवण्यासाठी केलेले अतिक्रमण,
- सेक्टर 20 मधील पादपथावर 25 चौ.मी. क्षेत्रफळावर राजकीय पक्षातर्फे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम,
- सेक्टर 20 मधील शाळा व खेळाच्या मैदानासाठी राखीव भूखंड क्र. 20 वर श्री. कडू यांच्यामार्फत पत्राशेड ढाब्याचे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम,
- सेक्टर 30 मधील अंदाजे 300 चौ.मी. क्षेत्रफळावरील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले स्टॉल व टपऱ्या,
- सेक्टर 37 मधील पादपथावरील अंदाजे 600 चौ.मी. क्षेत्रफळावरील राजकीय पक्षातर्फे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, सेक्टर 35 एच मधील अंदाजे 4000 चौ.मी. क्षेत्रफळावरील भूखंड क्र. 6 अ व 6 ब आणि 34 अ, 34 ब, 34 क, 35 इ व 35 फ वरील अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला डेली बाजार, मच्छी बाजार , पदपथावरील दुकाने व साइनबोर्ड.
- सेक्टर 12 आणि 7 मधील भूखंड क्र. 15च्या परिसरातील 20 फेरीवाले व अनधिकृतरित्या टाकण्यात आलेल्या दुकानावरील शेड
सदर अनधिकृत बांधकामांविषयी अभियांत्रिकी विभाग व खारघरमधील नागरीकांकडून नियमितपणे तक्रारी येत होत्या. ही बांधकामे सिडकोतर्फे कोणताही विकास परवाना न घेता सिडकोच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली असल्याने सिडकोतर्फे कारवाई करून तोडण्यात आली.
सदर मोहिम अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) डि. के. जोगी, सहाय्यक अनधिकृत बांधकाम नियंत्रक एस. आर. राठोड व डी. झेड. नामवाड आणि इतर सहाय्यक अधिकारी यांच्या पथकाने पार पाडली. सहाय्यक पोलिस आयुक्त निलेवाड, खारघर पोलिस स्थानकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोनावणे व 60 पोलिसांचेही यावेळी सहकार्य घेण्यात आले. मोहिमेच्या ठिकाणी सिडकोचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरवसे त्यांच्या कर्मचा-यांसोबत उपस्थित होते. या कारवाईसाठी 1 पोकलेन, 2 जेसीबी, 2 ट्रक , 5 जीप व 30 कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.