ठाणे, 11 डिसेंबर 2016/ AV News Bureau
आता सर्व आर्थिक व्यवहार बँकांद्वारे होणार असल्याने सर्वांचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. यापुढे सर्वांना पगार/ मेहनताना चेक किंवा ईसीएस द्वारा मिळणार आहे, त्यामुळे असंघटीत घरेलू महिला कामगारांनीही बँकेत खाते उघडावे असे आवाहन बँकांच्या वित्त व ऋण सल्लागार सविता पावसकर यानी केले. श्रमिक जनता संघ व समता विचार प्रसारक संस्था आयोजित घरेलू कामगार व असंगठित कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.
कळवा येथील जवाहर वाचनालय येथे संपन्न झालेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी श्रमिक जनता संघाचे चिटणीस, कामगार नेते जगदीश खैरालिया होते. कार्यक्रमात २५ घरेलू क़ामगार महिलांचे बँक ऑफ महाराष्ट्र, कळवा शाखेत नविन बचत खाते उघडण्यात आले.
कळवा परिसरातील सुमारे १५० घरेलू कामगाराना महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळात रजिस्ट्रेशन साठीचे फार्म यावेळी भरण्यात आले. घरेलू कामगार व अन्य असंगठित कष्टकर्यांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी एकजूट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. बँक ऑफ महाराष्ट्र, कळवा शाखेचे उपव्यवस्थापक मोहन साबळे, श्रमिक जनता संघाचे ज्येष्ठ नेते संजीव साने, सुनंदा गोळे, यशोदा पवार, स्वराज अभियानचे सुब्रेतो भट्टाचार्य, उन्मेष बागवे, श्रमिक जनता संघाचे नंदकुमार म्हात्रे, मनोज पडवळ भास्कर शिगवण व समता विचार प्रसारक संस्थेचे सुनिल दिवेकर उपस्थित होते.