नागपुर, 6 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
‘बाबरी मस्जिद’ पाडण्याची घटना ही ” दस्तुरे-हिंद की रूसवा” (संविधानाचा अपमान) असल्याचे मत व्यक्त करत बाबरी मस्जिद पुन्हा मूळ जागीच उभारावी, अशी मागणी समजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी नागपूर येथे केली. विधिमंडळाच्या परिसरात पत्रकारांसोबत त्यांनी ही मागणी केली.
आज या घटनेला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आझमी यांनी त्यांच्या उजव्या बाहुवर ‘काळी फित’ बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला. विधानसभेत प्रवेश करण्याअगोदर त्यांनी ‘ बाबरी मस्जिद को इन्साफ कब मिलेगा’ अशा आशयाचे बॅनर विधिमंडळ परिसरात झळकावून परिसरात उपस्थित असलेल्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘बाबरी मस्जिदीला धक्का देखील लागणार नाही’ अशी ग्वाही देत न्यायालयात ‘प्रतिज्ञापत्र’ उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांनी सादर केले होते. मात्र, तरी देखील बाबरी मस्जिद पाडण्यात आली. त्यामुळे कल्याणसिंग यांना १ दिवसाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हा न्यायव्यवस्थेचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तत्कानील प्रधानमंत्री पी.व्ही.नरसिंम्हराव यांनी ६ डिसेंबर १९९२ ला संध्याकाळीच मस्जिद बनवणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र, २४ वर्ष होवून देखील ‘मस्जिद’ बनवण्यात आली नाही. ६ डिसेंबर १९५६ ला बाबासाहेबांचे महापरिनिर्वान झाले. मात्र, त्यांच्या महापरिनिर्वानच्या दिवशीच म्हणजेच ६ डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडून बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान करण्यात आला,असेही आझमी म्हणाले.