गझलचा काळ कधीच संपणार नाही- तलत अझिझ

मुंबई, 6 डिसेंबर 2016:

काळानुरुप संगीत क्षेत्रातही कमालीचे  बदल होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संगीताचे क्षेत्र अधिक व्यापक होत आहे. मात्र असे असले तरी जे संगीत पूर्वापार चालत आले आहे. त्याला धक्का लागणार नाही, असे मत प्रसिद्ध गझलकार तलत अझिज यांनी व्यक्त केले आहे. संगीतामधील बदल सध्याच्या आवडीनुसार केले जात आहे, त्यामुळे चित्रपटांमधून गझल काहीसे कमी झाले असले तरी गझलचा काळ कधीच संपणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

रेडिओवरील ‘कारवां ए गजल’ च्या माध्यमातून गझल लोकांच्या मनात रुजवणारे तलत अझिझ म्हणतात की,  लोकांमध्ये गझलची क्रेस अद्याप बाकी आहे. मात्र त्याचा वेग काहीसा मंदावला आहे. जेव्हा हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा आमचा श्रोतावर्ग हा ४५ वर्षांवरील लोक होते. मात्र नंतर कळले की, २५ वर्षांच्या तरुणांमध्येही गझलची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे.यावरुन एक गोष्ट नक्की की, आजही गझल सर्व वयाच्या लोकांवर राज्य करते.

मेहंदी हसन आणि जगजित सिंग यांना उत्कृष्ट गझल गायक म्हणून तलत अझिज मानतात. मात्र या पदावर पोहोचण्यासाठी या दोन्ही गायकांना कित्येक वर्ष संगिताची साधना करावी लागली,असेही तलत सांगतात.

या दोन्ही गायकांच्या महात्म्याबद्दल सांगताना तलत म्हणतात की, मेहंदी हसन यांनी प्रारंभीच्या काळात क्लासिकल गाण्यावर भर दिला होता. मात्र जेव्हा त्यांनी गझलकडे मोर्चा वळविला, त्यानंतर पाच दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी गझलवरच लक्ष केंद्रीत केले. तर जगजित सिंग यांनी महेफिलींमधून गझलला सर्वासामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. यामागे अतिशय खडतर मेहनतच आहे. आजच्या पिढीतही अनेक चांगले गझल गायक आहेत, त्यांच्या माध्यमातून गझलचा प्रवास सुरूच राहील, असेही तलत यांनी म्हणतात.