डॉ. स्नेहलता देशमुख,प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ
AV News Bureau :
घरात बाळ येणार… या कल्पनेनं सारं घर आनंदात न्हाऊन निघालेलं असतं. घरातच नव्हे तर या सृष्टीत प्रथमच पाऊल टाकणाऱ्या या पाहुण्याच्या स्वागताला सारे सगे सोयरे आसुलेले असतात. घरात येणारा हा पाहुणा किंवा पाहुणी कशी असेल, याची उत्सुकता सर्वांना असते. शेवटी तो दिवस उगवतो आणि नवा पाहुणा या जगात अवतरतो. परंतु घरातील सर्व व्यक्तींना आनंदाऐवजी काळजीने ग्रासलेले असते. कारण जन्माला आलेलं मूल अपंग असते. त्याला काहीतरी व्यंग असते. जन्मतःच अंपगत्वामुळं या बाळाच्या पुढील भविष्यातही अनेक प्रश्न निर्माण होणारे असतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सुदृढ बाळाला जन्म देण्यात बऱ्याच अडचणी येत असल्याचं दिसून येतं.माता-पित्याच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्याचा येणाऱ्या बाळावर परिणाम होत असतो. त्यामुळं अनेकदा बाळात व्यंग वा व्याधी निर्माण होण्याची भिती अधिक वाढते. बाळातील हे व्यंग टाळण्यासाठी तसेच बाळ सुदृढ आणि सशक्य व्हावे यासाठी पहिल्यापासूनच म्हणजे गर्भावस्थेतच काळजी घेतली तर बऱ्याच अंशी बाळाला संभाव्य धोक्यापासून दूर ठेवता येते. बाळाच्या सुदृढ आणि सशक्तपणासाठीच्या गरजेतूनच गर्भसंस्कार या संकल्पनेला अधिक बळ मिळते.
गर्भसंस्कार म्हणे अव्यंग, सुदृढ, सुजाण आणि सृजनशील बाळ जन्माला यावं म्हणून बाळाच्या आईनं करावयाची एक साधना. या लेखाच्या माध्यमातून मातेच्या शंकांचं थोड्या प्रमाणात का होईना पण निरसन व्हावे, तिला मनःशांती मिळावी, हा एकच उद्देश आहे.
गर्भसंस्कारामुळं बाळाची भावनिक वाढ उत्तम होण्यास मदत होते. मात्र या सगळ्या उपक्रमात आईबरोबर त्या संपूर्ण कुटुंबाचा मोलाचा सहभाग असणे गरजेचे असते. या उपक्रमाअंतर्गत त्या आईनं नऊ महिन्यांत घ्यायची काळजी, गर्भाच्या वाढीसाठी उपयुक्त संगीताचे महत्त्व, व्यायामाचे स्वरुप आणि फायदे, आहाराबद्दल माहिती, आपल्या बाळाशी सुसंवाद ही पाच उद्दिष्ठं डोळ्यासमोर ठेवून त्यादिशेने मार्गदर्शन केले जाते.
गर्भाचे मानसशास्र
संस्कार म्हणजे शुद्धीकरण, रुपांतर किंवा बदल. मुलांवर संस्कार करायचे म्हणजे ते मुलांच्या मनातील शुद्र विचार नाहीसे करून त्यांच्या जागी चांगल्या विचारांची बैठक निर्माण करावी. हे संस्कार गर्भावस्थेपासूनच करणे शक्य आहे. गर्भावस्थेत चेतापेशींची वाढ होत असल्याने गर्भाची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. गर्भाचे पोषण व्यवस्थित व्हावे म्हणून संतुलित आणि स्वच्छ आहार घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, क्षार, लेसिथिन आणि ओमेगा थ्री यांचा समावेश असावा. गर्भाच्या शारिरीक पोषणाची जबाबदारी तेवढी असते तेवढीच त्याच्या मानसिक पोषणाची जबाबदारीही आईवरच पडते. या कामात पित्यानेही तेवढ्याच तन्मयतेने आणि जबाबदारीने सहभागी व्हायला हवे. इतकेच नाही तर गर्भवती मातेचे मन संगोपन ही कुटुंबियांची जबाबदारी आहे.
गर्भवती मातेच्या मनाचा आणि गर्भातील मुलाच्या मनाचा परस्परसंबंध आयुर्वेदात उद्धृत केला आहे. गर्भवती जन मनाने कुणाचा द्वेष करीत असेल तर जन्माला येणारं मुलही द्वेषाने पछाडते. मद्यप्राशनानं मूल कमी स्मरणशक्तीचे व चंचल स्वभावाचे होते. अतितिखट खाण्यानं दुर्बल मूल जन्माला येतं, असं चरकाने नमूद केले आहे. त्यामुळं या विषयावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास सुरू आहे. भावी पिढी स्थिरबुद्धीची, सुसंस्कारित, मनमिळावू, विजीगिषू, ताणतणाव सहज हसत झेलणारी व्हावी म्हणून शास्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू आहे. बाळाचे मन समर्थ होण्यासाठी पाया गर्भमानस शास्रापासूनच घ्यायला हवा.
गर्भधारणा झाल्यापासून बाळाचा जन्म होईपर्यंत साधारणपणे ३८ आठवडे एवढा कालावधी असतो. यामध्ये तीन महत्वाचे टप्पे मानले जातात. पहिला टप्पा एक ते तीन महिने, दुसरा टप्पा चार ते सहा महिने आणि तिसरा टप्पा सात ते नऊ महिने असा मानला जातो. गर्भधारणेची नक्की अथवा निश्चित वेळ सांगता येत नाही. त्यामुळं शेवटच्या मासिक पाळीपासून पुढे ४० आठवडे मोजून बाळाच्या आगमनाची तारीख ठरवली जाते.
पहिले तीन महिने हे अत्यंत महत्वाचे असतात. कारण बाळावर बाहेरील वातावरणाचा परिणाम होत असतो. मानसिक ताणतणाव, अति शारिरीक श्रम, रोगाची लागण यामुळं गर्भपाताची शक्यता अधिक अशते. म्हणून व्हायरसमुळे होणारे रोग टाळण्यासाठी रोगप्रतिबंधक व्हॅक्सिन देणे आवश्यक असते. गर्भधारणेचा संशय आल्याबरोबर फोलिक असिडची गोळी रोज एक जरूर घ्यावी.
बाळाची योग्य आणि सुदृढ जडणघडण होण्यासाठी पहिले तीन महिने खूप महत्वाचे असतात. त्यामुळं या महिन्यात मातेनं दिर्घ प्रवास कटाक्षानं टाळावा. जड वस्तू उचलू नये, डॉक्टरच्या सल्ल्याने थोडे व्यायामप्रकार करावेत. छोट्या मोठ्या आजारावर स्वतः औषधे न घेता डॉक्टरांशीच सल्ला मसलत करावी आणइ औषधे घ्यावीत. कोमट पाण्याने आंघोळ करावी.
मद्यपान, धुम्रपान, रस्त्यावरील तसेच चमचमीत खाणे टाळावे. हलका आहार घ्यावा. विशेषतः या टप्प्यात फोलिक असिडची भरपूर आवश्यकता असते. याकरिता सकाळी चहाऐवजी नाचणीच्या सत्वाची जाडसर लापसी किंवी खीर दुधातून घ्यावी. नाचणीमध्ये थोड्याफार प्रमाणात लोह कॅल्शियम असते. ही लापशी दुधातून घ्यावी.
गर्भधारणेपासून पहिल्या २८ दिवसां बाळाच्या शरीराची वाढ कशी होणार हे ठरणार असते. जर फोलिस असिडची उणीव असेल तर पाठीच्या मज्जारज्जूंमध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता असते. ज्या स्रियांच्या शरिरात फोलिस असिडची व्यवस्थित प्रमाणात असते, त्यांच्या मुलांमध्ये हे दोष दिसून येत नाहीत. या नऊ महिन्यांत आईनं चौरस आहार घ्यायला पाहीजे, याची काळजी कुटुंबातल्या प्रत्येकानं घ्यायला हवी.
मोड आलेल्या कडधान्यातून प्रथिने आणि ओमेगा थ्री ही शरिराला आवश्यक अशी फॅटी असिड्स मिळतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह या घटकाचा समावेश असतो. त्यामुळं कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या या जेवणात तर असाव्यातच शिवाय दूध, शेंगदाणे, राजगिरा, खजूर, बीट, गाजर हे पदार्थही विशेषत्वाने गरोदर स्रीच्या जेवणात असावेत. दिवसातून एकदा तरी नाचणी किंवा जवस यांच्या पिठाची भाकरी करून खावी. गर्भारपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम, लोह व जीवनसत्व या गोळ्या नियमित घ्याव्यात.
थोडक्यात, आईची तब्बेत सुदृढ असेल तर बाळही सुदृढ होईल, यात शंका नाही. आता बाळाचे स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी गर्भार संस्काराची प्रक्रिया समजावून घेऊया.
विज्ञानाची प्रगती वायूगतीने होत आहे. आपल्या पुराणात सांगितलेल्या अनेक गोष्टी आपण पुराणातील वांगी म्हणून सोडून देतो. मात्र आता विज्ञानानेच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. अभिमन्यूची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे.
गर्भावस्थेत असताना मुलाला ऐकू येते. त्याच्या कानावर पडलेले शब्ध जरी पूर्ण समजण्याची क्षमता त्याची नसली तरी त्याला ताल जरूर समजतो आणि सातत्याने एखादी गोष्ट सांगितल्यास त्याच्या लक्षातही राहते आदी गोष्टी आता पुष्कळशा स्पष्ट झाल्या आहेत.
गर्भाशी संवाद साधण्याचे एक खास तंत्र आहे. मातेचा स्पर्श, तिने दिलेली शाबासकीची थाप त्याला फार भावते. आपण त्याच्याशी बोललो की तो चेहऱ्यावर दर्शवितो. विज्ञानाच्या शिक्कामोर्तबाने आता अभिमन्यूची गोष्टदेखील पुराणात राहिलेली नाही तर खरोखर गर्भावर संस्कार करता येतात, हे आता सिद्ध झाले आहे.
वाग्भट वाड्:मयामध्ये चौथ्या व पाचव्या महिन्यांत बुद्धीची व हृदय क्रियेची कशी वाढ होते हे विस्ताराने सांगितले आहे. या महिन्यात बाळाच्या कानाचा आकारही पूर्ण झालेला असतो आणि त्याला ऐकू येते. त्यामुळं या महिन्यांत ओम काराचा जप सातत्याने करावा. पातंजली शास्राप्रमाणे ओमकाराने आत्म्याचा विकास होतो. आत्मविश्वास वाढतो. आळस व कंटाळा जावून दृष्ट प्रवृत्तींचा विनाश होतो. त्याचप्रमाणे गर्भाला जर निरनिराळी स्रोत्रे ऐकवली गेली तर श्रीसूक्त ऐकवल्यावर तो चांगला प्रतिसाद देतो, असे आढळून आले.
गर्भातील बाळाला पसायदान तसेच गीता, महाभारत यांबरोबर पौराणिक कथा कथन कराव्यात. त्यामुळं भक्ती, प्रेम आदी गोष्टींचं गर्भाला आकलन होण्यास मदत होते.
गर्भाशी संवाद साधण्याचं एक तंत्र विकसित केलं गेलं आहे. त्यामध्ये स्पर्श आणि ध्वनी या दोघांची सांगड घातली आहे. आईच्या हळुवार स्पर्शानं बाळाला आनंद होतो हे सर्वज्ञात आहे. म्हणून सकाळी सुर्योदयाच्या वेळेस आपल्या पोटाला आईनं हळुवार स्पर्श करीत हलकाससा मसाज करावा. आपली नाभी हा सूर्य आहे, असे मानून सूर्याचे किरण जसे दशदिशांना उजळून टाकतात, त्याचप्रमाणे नाभीच्या सर्व बाजूंनी मसाज करावा. दोन्ही हातांच्या बोटांवर खोबरेल तेल घेऊन बाहेरच्या बाजूनं नाभीपर्यंत यावं. असं करताना आई बाळाच्या सगळ्या अवयवांना स्पर्श करीत असते. साहजिकच बाळ खूश होते. हे करताना आईनं बाळाशी बोलायचं आणि त्याला संदेश द्यायचा कि, बाळा, तू सूर्यासारखा तेजस्वी हो, सर्व जगाला कल्याणकारी हो. सूर्याची स्तूती करीत सूर्यनारायणाची बारा नावे घ्यावीत. त्यानंतर गायत्री मंत्र, त्यानंतर सायंकाळी शुभंकरोती आणि राम रक्षा म्हणाव्यात.
गर्भातील बाळाला संगीत खूप आवडते असे आता अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे. तबल्याचे बोल, संतूर, सतार ही वाद्ये, यमन, पूरिया आणि धनश्री रागांचे आलाप गर्भाला फार प्रिय असतात. आईनं जर हे संगीत ऐकले तर बाळ आईच्या पोटात शांत राहून ते ऐकतं असही सिद्ध होत आहे.
पंडित शशांक कुट्टी यांची सूरसंजीवन नावाची सूरसंजीवन नावाची कॅसेट बाळाचे वजन वाढविण्यासा उपयुक्त ठरू शकते. तर गर्भसंगीत ही मनःशक्ती केंद्रानं काढलेली ध्वनीफितही उपयुक्त आहे. यात गायत्री मंत्र, रागदारी आणि गर्भोपनिषदातले मंत्रोच्चार हे बाळाचे व आईचे नाते दृढ करते, असं दिसून आलं आहे. बालाजी तांबे, टाइम्स म्युझिक याही कॅसेट्स उपलब्ध आहेत. परंतु या सगळ्यांपेक्षा बाळाला जो जास्त भावतो, तो आई-बाबांचा आवाज. त्यामुळं आपलं मूल अधिक सुदृढ आणि सशक्त व्हावं यासाठी स्वतः मात्यापित्यांनी आपल्या मुलावर प्रेमानं संस्कार करावेत. जेणेकरून तो जेव्हा या जगात येईल, तेव्हा एक सुसंस्कारित आणि सुदृढ बाळ आफल्यात असेल, हे नक्की.