ठाणे पालिका आयुक्तांचे अधिकारी, ठेकेदारांना आदेश
ठाणे,2 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
ठाणे शहरातील रस्ता रुंदीकरणाची कामे कुठल्याही परिस्थितीत 31 डिसेंबरपर्यंत पुर्ण कराच, असे सख्त आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अभियंते आणि ठेकेदारांना दिले आहेत. तसेच दिलेल्या वेळेत काम पुर्ण न करणाऱ्या ठेकेदारांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.
आयुक्त जयस्वाल यांनी शहरातील रस्ते कामाबाबतचा आढावा घेण्यासाठी पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची संयुक्त बैठक बोलावली होती. त्यावेळी आयुक्तांनी रस्ते कामे पुर्ण करण्यासाठी 31 डिसेंबरची मुदत दिली आहे.
पावसाळ्यापूर्वी ठाणे शहरामध्ये पोखरण रोड क्रमांक 1, पोखरण रोड क्रमांक 2, कापूरबावडी, कापूरबावडी ते बाळकुम, शास्रीनगर, स्टेशन परिसर, घोडबंदर सर्व्हिस रोड, कळवा आणि मुंब्रा आदी ठिकाणी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर त्या त्या ठिकाणच्या रस्त्यांचीही कामे प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात आली होती. मात्र पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे पुर्ण झाली तर काही कामे पावसाळ्यामुळे थांबविण्यात आली होती. मात्र आता राहिलेली सर्व कामे 31 डिसेंबरच्या आत पुर्ण करा, असा आदेश जयस्वाल यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे.