माजी आमदार सुरेश गंभीर आणि बेस्ट समिती सदस्य सुनिल गणाचार्य यांचा भाजपात प्रवेश
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेनेला दणका
मुंबई, 2 डिसेंबर 2016/AV News Bureau :
माहिम विधानसभा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून निवड़ून आलेले सुरेश गंभीर आणि बेस्ट समितीवर सदस्य म्हणून कार्यरत असलेले कामगार नेते सुनिल गणाचार्य यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. मुंबई महापालिकेची निवडणूक आता दोन महिन्यांवर आलेली असताना भाजपने दोघांना फोडून शिवसेनेला मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर औपचारिक प्रवेशाचा कार्यक्रम मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झाला.
सुरेश गंभीर यांची राजकीय कारकिर्द
माहिम परिसरातून १९७८ साली नगरसेवक आणि त्यानंतर माहिम विधानसभा मतदार संघातून चार वेळा आमदार म्हणून सुरेश गंभीर निवडून आले होते. तसेच त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. तळागाळातील कार्यकर्ते अशी त्यांची ओळख असून त्यांच्यासोबत आज त्यांची कन्या मिनल गंभीर- देसाई यांनीही भाजपात प्रवेश केला.
सुनिल गणाचार्य यांची राजकीय कारकिर्द
सुनिल गणाचार्य हे बेस्ट समितीवर कार्यरत असून एक अभ्यासू सदस्य अशी त्यांची ओळख आहे. १९९७ ते २००२ या काळात ते कुर्ला येथून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर त्यानंतर २००४ पासून ते बेस्ट समितीवर सदस्य म्हणून आज तागायत कार्यरत आहेत. तर २००५ पासून बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणिस आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणिस म्हणून कार्यरत आहेत.
पक्ष प्रवेशानंतर बोलताना माजी आमदार सुरेश गंभीर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समाजातील तळागाळातील उपेक्षीत वर्गासाठी काम करत आहेत. त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी ज्या पक्षात होतो तिथेही मला सन्मानाची वागणूक मिळाली माझा कोणताही रोष त्या पक्षावर नाही. मी कोणत्याही पदासाठी आणि उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला नाही, असे त्यांनी स्ष्ट केले.
मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे त्यामुळे मुंबईच्या विकासासाठी काम करणाऱ्या भाजपा मध्ये मी आज प्रवेश करत आहे. मला या विकासकामांत आणि जनतेच्या सेवेत काम करता यावे म्हणून भाजपा मध्ये येत असल्याचे सांगत आपला पूर्वीच्या पक्षावर कोणताही रोष नाही असे सुनिल गणाचार्य यांनी स्पष्ट केले.