वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ
ठाणे,2 डिसेंबर 2016 / AV News Bureau :
ठाणे जिल्ह्यातील धसई गावाला देशातील पहिले कॅशलेस गाव होण्याचा मान मिळाला आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. येत्या काळात महाराष्ट्र देशातील पहिले कॅशलेस राज्य ठरावे, यावर आपला भर राहील, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले.
धसई गावात 1 डिसेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह बँक ऑफ बडोदा चे महाप्रबंधक नवतेज सिंग, वीर सावरकर प्रतिष्ठानचे रणधीर सावरकर, आ. किसन कथोरे आदी उपस्थित होते. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्वतःचे डेबीट कार्ड वापरून मुरबाड तांदूळ खरेदी करत कॅशलेस गाव उपक्रमाचा शुभारंभ केला. यानंतर गुरूकृपा स्टोअर्स या दुकानाला त्यांनी भेट दिली व तेथील स्वाईप मशीन व अन्य व्यवस्थांची पाहणी केली.
कॅशलेस धसई गाव
- लोकसंख्या 10 हजार
- 60 छोटे गाव व्यापार उदीमासाठी धसई गावावर अवलंबून
- बँक ऑफ बडोदा च्या सहकार्याने गाव कॅशलेस करण्याचा उपक्रम सुरू
- या गावातील नागरिकांकडे जनधन खाते असल्यामुळे डेबीट कार्ड आधीपासूनच त्यांच्याकडे उपलब्ध
- 39 स्वाईप कार्ड मशीनसाठी अर्ज करण्यात आलेले आहे.
- या मशीन खरेदी करणा-यांमध्ये वडापाव विकणारे सुध्दा आहेत.
- ज्या दुकानदारांकडे चालू खाते नव्हते त्यांच्यासाठी सुध्दा त्वरीत खाते उघडण्यात आले आहेत.
हे गाव कॅशलेस होण्याच्या दृष्टीने वीर सावरकर प्रतिष्ठान एनजीओ ने महत्वपूर्ण भूमीका बजावली असुन संस्थेच्या माध्यमातुन नागरिकांना प्रशिक्षीत करण्याचे काम सुध्दा करण्यात आले आहे.