पालिका प्रशासनाकडून 290 बेकायदेशीर खोल्या उध्वस्त
पालिका आयुक्त संजीव जैसवाल यांच्याकडून बेकायदेशीर बांधकावर हातोडा
ठाणे,2 डिसेंबर 2016/ AV News Bureau :
शहरातील उपवन भागात असलेल्या सत्यम लॉजमध्ये भूमीगत तीन मजली अनधिकृत बांधकाम करून 290 खोल्या उभारण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या भूमिगत लॉजमध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून हे बांधकाम उध्वस्त केले आहे. मात्र तळघरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची कल्पना पोलिसांना नव्हती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
- 16 खोल्यांचाच कर भरणार
सत्यम लॉजच्या मालकाने केवळ 16 खोल्यांचाच करभरणा केल्याची माहिती पालिकेच्या कर विभागाकडे असलेल्या नोंदीवरून समोर आले आहे. त्यामुळे भूमिगत असलेल्या तब्बल 290 खोल्या पूर्ण बेकायदेशीर बांधकाम असून तेथे अनैतिक व्यवहार सुरू असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. तेथे काही आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी तपासाअंती पत्रकारांना सांगितले.
- लॉजवर येणारे ग्राहक
उपवन तलावापाशी नेहमी प्रेमी युगुलांचा वावर असतो. अनेक जोडपी, मुंबई,नाशिक अथवा गुजरात असा प्रवास करणारे काही प्रवासी यांच्याकडून या लॉजचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
- पोलीस अनभिज्ञ
अतिशय मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या या लॉजमधील अनैतिक व्यवहारांबाबत पोलिसांना काहीच माहिती कशी नाही, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.पोलीस, पालिका प्रशासन आदींना या बेकायदेशीर लॉजची माहितीच नव्हती कि त्याकडे कानाडोळा केला जात होता, असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
- आतापर्यंतची कारवाई
ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सुरू असलेले डान्सबार,अनैतिक धंदे चालणारे लॉज यांच्यावर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. अतिक्रमण विभागाने सुमारे 32 ऑर्केस्ट्रा बार, 37 लॉजिंग अँड बोर्डिंग, 70 भंगाराची दुकाने, 17 कार सर्व्हिसिंग सेंटर्स, 25 ढाबे,30 फर्निचर शोरुम्स, 50 गॅरेज,10 हॉटेल शेड्स अशा जवळपास 350 बांधकामांवर बुलडोझर चालविला आहे.