मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व निवडणुका लढवणार
मुंबई,1 डिसेंबर 2016/AV News Bureau :
मराठा समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून शिवसेनेशीही दोन हात करणारी संभाजी ब्रिगेड ही संघटना आता राजकारणात उतरली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संघटनेचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी राजकीय पक्ष म्हणून यापुढे कार्यरत राहणार अधिकृतरित्या जाहीर केले. आगामी मुंबई,ठाणे महापालिकांसह राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये हिररिने सहभागी होणार असल्याचेही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.
संभाजी ब्रिगेडची वाटचाल
पुण्यातील भांडारकर संस्थेविरोधातील आंदोलन, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे आंदोलन, मराठा समाजाला आरक्षणाला पाठिंबा यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांमध्ये संघटनेचा जनाधार वाढला आहे. मोठ्या संख्येने तरुण मंडळी या संघटनेशी जोडले जात आहेत.
संघटना ते राजकीय पक्ष
राजकीययययय दृष्ट्या सक्रीय होणे बहुजनांच्या हिताचे आहे. त्यामुळे यापुढे संभाजी ब्रिगेड हा पक्ष म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न आणि शिक्षण आदी मुद्द्यांवर आक्रमक होणार आहे. तसेच या मुद्द्यांच्या आधारे निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी स्पष्ट केले आहे.
एक पताका भगवा ध्वज आणि त्यावर संभाजी ब्रिगेड असे लिहिलेला पक्षाचा अधिकृत ध्वज राहणार आहे. गाव तसेच तालुका पातळीवरही पक्षाची पाळेमुळे रुजवण्यावर भर देण्यात येणार आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून मनोज आखरे राहणार आहेत. तर पक्षाचे प्रवक्ते शिवानंद भानुशय आणि मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष अजय यादव काम सांभाळणार आहेत.