वॉशिंग्टन,1 डिसेंबर 2016:
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प नव्या वर्षात जानेवारीमध्ये व्हाइट हाउसमध्ये रहायला जाणार आहेत. विशेष म्हणजे ट्रम्प व्हाइट हाउसमधून आपल्या राष्ट्रपतीपदाची कारकिर्द सुरू करणार असताना त्यांच्या पत्नी मेलानिया आणि त्यांचा मुलगा बैरन ट्रम्प यांनी मात्र व्हाइट हाउसमध्ये जाण्यास नकार दिला आहे. बैरना याचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने हा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प कुटुंबाच्या प्रवक्त्यांनी याबाबतचे निवेदन जाहीर केले आहे. डोनाल्ड आणि मेलानिया यांचा मुलगा बैरन याचे शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेले नाही. बैरन मध्येच आपली शाळा सोडून दुसरीकडे जावू शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण होईपर्यंत मेलानिया या बैरनसोबत न्यूयार्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ट्रम्प कुटुंबाच्या या निर्णयाबाबत प्रसारमाध्यम तसेच सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. काहींनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे तर काहींनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेली व्यक्ती आपल्या कुटुंबासमवेतच व्हाइट हाउसमध्ये वास्तव्याला जाते. राष्ट्रपतीच्या कुटुबाला देशाचे प्रथम कुटुंब मानले जाते. त्यामुळे राष्ट्रपतीचे कुटुंबासमवेत व्हाइट हाउसमध्ये वास्तव्याला जाणे ही बाब अमेरिकेच्या नागरिकांसाठी गौरवाची असते. मात्र ट्रम्प कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
काहींनी तर हा निर्णय हसण्यावर नेला आहे. व्हाइट हाउसमधील फर्निचर आणि इंटिरियर हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांना पसंत पडले नसल्यामुळे त्या राहण्यास जाणार नाहीत, असे म्हणतात. त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांच्यात काही बिनसले तर नाही ना ? अशीही चर्चा सुरू आहे.
एकीकडे ट्रम्प कुटुंबाच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे त्यांच्या निर्णयाचे समर्थनही केले जात आहे.
तो एका जबाबदार कुटुबांने घ्यायला हवा, तोच निर्णय ट्रम्प कुटुंबाने घेतला आहे, असे मतही अनेकांनी ट्वीटरवर व्यक्त केले आहे.
बैरनचा अभ्यास आणि देखभाल करण्यात अधिक वेळ जात असल्यामुळे मेलानिया यांनी निवडणुकीच्या काळात ट्रम्प यांच्या प्रचारातही अधिक सहभाग घेतला नव्हता.