हिलरींसाठी लोकांनी बोगस मतदान केले- ट्रम्प

वॉशिंग्टन,30 नोव्हेंबर 2016 :

अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधीपासून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहेत. ८ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षातर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासाठी लाखो नागरिकांनी बोगस मतदान केल्याचा आरोप नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ ट्रम्प यांनी कोणताही पुरावा सादर केलेला नाही.

ट्वीटच्या माध्यमातून ट्रम्प यांनी म्हटले आहे की, निवडणुकीत झालेले बोगस मतदान गृहित धरले नाही तर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील लोकप्रिय मतांबाबतही ते विजय झाले असते.

तीन राज्यांत मतदानात गडबड

वर्जिनिया, न्यू हॅम्पशायर आणि कॅलिफोर्निया या तीन राज्यांमध्ये आपल्याला कमी मतदान झाले तिथे मोठ्या प्रमाणात मतदानात गडबड झाल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.

ट्रम्प यांनी राष्ट्रपती बनण्यासाठी आवश्यक असलेली मते आधीच मिळवली आहे. मात्र लोकप्रिय मतांच्या मुद्द्यावरून ट्रम्प यांनी बोगस मतदानाचा आरोप केला आहे. कारण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्याविरोधात २० लाखांपेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच कॅलिफोर्नियासारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये अद्याप मतमोजणी सुरू आहे.त्यामुळे  हिलरी यांची मते २५ लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.