‘क्रीडा शिष्यवृत्ती’ साठी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरा

नवी मुंबई,30 नोव्हेंबर 2016 /AV News Bureau:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी पात्र खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी 30 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नवी मुंबईतून अधिकाधिक गुणवंत खेळाडू निर्माण होऊन शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडावी यादृष्टीने “क्रीडा प्रशिक्षण केंद्र”, “स्पोर्टस नर्सरी”, “क्रीडा स्पर्धा” असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

क्रीडा शिष्यवृत्तीसाठी अट

महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी असलेले आणि शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2015-2016 मध्ये सहभाग घेतलेले तसेच प्राविण्यप्राप्त खेळाडू त्याचप्रमाणे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडू यांना “क्रीडा शिष्यवृत्ती” लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासानाने घेतला आहे.

पात्र खेळाडूंनी 30 डिसेंबरपर्यंत “क्रीडा शिष्यवृत्ती” करीता विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक माहिती क्रीडा विभागाकडे करावी, असे आवाहन महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले आहे.  30 डिसेंबरनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही , असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.