पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदेश
नवी दिल्ली,29 नोव्हेंबर 2016 :
संपूर्ण देशातून काळा पैसा आणि गैरव्यवहाराचा नायनाट करण्याचा विडा उचलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता तर स्वपक्षाच्या आमदार, खासदारांवरच लक्ष केंद्रीत केले आहे. नोटबंदीच्या दिवसांपासून डिसेंबर 2016 अखेरपर्यंत बॅंक खात्यांमधील व्यवहारांचा तपशील पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपविण्याचे आदेश मोदींनी दिले आहे. मोदींच्या या आदेशामुळे भाजपच्या गोटातही खळबळ उडाली आहे.
देशातील बेहिशेबी पैशाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी अचानकपणे 500 आणि 1000 रुपये किमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे देशात एकच खळबळ उडाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसत आहे. तसेच व्यापार उद्दीमावरदेखील परिणाम झाला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राजकीय वातावरणही तापलेले आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या आमदार आणि खासदार यांनाही 8 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या काळात बॅंकेत केलेल्या व्यवहारांबद्दलची माहिती 1 जानेवारी रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. मोदींच्या स्वपक्षीय आमदार, खासदारांचीही चौकशी सुरू केल्यामुळे विरोधी पक्षांचीही मोठी कोंडी झाली आहे.
विरोधी पक्षांनी संसदेत सरकारला आणि खासकरून पंतप्रधान मोदींना लक्ष केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र मोदी यांनी आपल्याच आमदार, खासदारांच्या बॅंक खात्यांची माहिती मागवून विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवल्याची चर्चा राजधानीत रंगली आहे. तसेच केंद्र सरकार पारदर्शकपणे काम करीत असल्याचा संदेशही पंतप्रधान मोदींनी आपल्या कृतीतून दिल्याचे बोलले जात आहे.